गोमाता पूजन उत्सवाचे देखील आयोजन.
रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर येथे सोमेश्वर शांतीपिठाच्या विश्वमंगल गोशाळेमध्ये वसुबारसनिमित्ताने २८ ऑक्टोबरला महाविष्णू वैदिक यज्ञ आणि गोमाता पूजन उत्सवाचे आयोजन केले आहे. या निमित्त गोशाळेच्या निवाराशेडचे उद्घाटन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून एक्झॉटिक फूड्चे जनरल मॅनेजर पुरुषोत्तम बाहेती व प्रमुख वक्ते म्हणून रा. स्व. संघाचे गोसेवा गतिविधी प्रमुख हरीओम शर्मा उपस्थित राहणार आहेत.शांतीपीठाच्यावतीने पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली.
विश्वमंगल गोशाळेच्या पहिल्या शेडचे काम पूर्ण झाले आहे आणि या शेडचे उद्घाटन २८ ला सकाळी ९.४५ वा. करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी दहा ते अकरा या वेळेत महाविष्णू यज्ञाकरिता १०१ दाम्पत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी १२ वा. गोपूजन, राजमाता गोमाता या विषयावर हरीओम शर्मा मार्गदर्शन करणार आहेत. गोमातेच्या सान्निध्यात दुपारी १.३० वा. महाप्रसाद दिला जाणार आहे. या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

सोमेश्वर येथील शशिकांत सोहोनी आणि कुटुंबीयांनी यासाठी ५ एकर १५ गुंठे जागा दान केली आणि प्रत्यक्ष गायींचे संगोपन व त्यासाठी आवश्यक व्यवस्थांचे काम चालू आहे. स्थानिक ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांचे चांगले सहकार्य लाभत आहे. गुरे मोकाट सोडू नयेत याकरिता शेतकऱ्यांचेही प्रबोधन केले जात आहे. परिसरात वड, पिंपळ, कडुलिंब, आवळा, जांभूळ आदी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे याशिवाय निसर्गोपचार योग उपचार, वृद्धाश्रम आणि महिला कौशल्य प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पत्रकार परिषदेला विश्वस्त राजेश आयरे, सेक्रेटरी अनुजा पेठकर, देवेंद्र झापडेकर, सल्लागार रवींद्र इनामदार, ट्रस्टी राजन रहाटे, ट्रस्टी अशोक पाटील, ट्रस्टी सुरेश दाते, ट्रस्टी विनायक हातखंबकर, ट्रस्टी राकेश वाघ, ट्रस्टी प्रकाश मुळये, मंदार पानवलकर, स्नेहल वैशंपायन, आदि मान्यवर उपस्थित होते.
कोकणगिड्ड संगोपनाचे काम सुरू!
सध्या कोकणगिड्ड ही जात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आजच या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर भविष्यात कोकणगिड्ड ही कोकणातील जात नष्ट होईल. त्यासाठी कोकणगिड्ड संवर्धनाचे काम सोमेश्वर येथील विश्वमंगल गोशाळेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सद्यःस्थितीत रत्नागिरी शहरातील भटक्या ५४ गायी, वासरांचे संगोपनाचे काम येथे सुरू आहे.
संस्थेकडून मदतीचे आवाहन.
दर महा समाजातील दानशूर व्यक्ति संस्थेला मदत करत असून आणखी गोप्रेमी नागरिकांनी पुढे येऊन संस्थेला मदत करण्याचे आवाहन संस्थेचे ट्रस्टी विनायक हातखंबकर यांनी केले.
