रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शेकडो किलोमीटर लांब तरुणाला पडलेलं स्वप्न खरं ठरलं आहे. खेडमधील भोस्ते घाटात एका व्यक्तीचा मृतदेह असल्याचं स्वप्न शेकडो किमी लांब असलेल्या तरुणाला पडलं. स्वप्नामध्ये ही व्यक्ती मदतीसाठी याचना करत होती, याबाबत तरुणाने खेड पोलिसांना कळवलं. पोलिसांच्या तपासात तरुणाला पडलेल्या स्वप्नातल्या गोष्टी खऱ्या ठरल्या. भोस्ते घाटामध्ये निर्जन ठिकाणी पोलिसांना कुजलेला मृतदेह सापडला.
बुधवार 18 सप्टेंबर रोजी मुंबई-गोवा महामार्गालगत भोस्ते घाटाच्या डोंगरात पहिल्यांदा मानवी शरिराची कवटी आणि काही अंतरावर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला, मात्र हा मृतदेह सापडण्याचं विचित्र कारणही समोर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या आजगाव येथील 30 वर्षीय योगेश पिंपळ आर्या या तरुणाला डोंगरात निर्जन ठिकाणी असलेला मृतदेह स्वप्नात आला होता. आपल्याला वारंवार हेच स्वप्न पडत असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. खेड रेल्वे स्टेशनसमोर एका डोंगरात पुरुषाचं प्रेत असून तो माझ्या स्वप्नात येऊन मदतीसाठी याचना करत आहे, असं योगेश आर्याने पोलिसांना सांगितलं
योगेश आर्याच्या स्वप्नाच्या या दाव्यानंतर खेड पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला. धक्कादायक गोष्ट म्हणजे योगेशच्या स्वप्नात आलेल्या ठिकाणीच पोलिसांना मानवी शरिराची कवटी आढळून आली. यानंतर पोलिसांनी दुर्गम डोंगराळ भागात शोध घेतला तेव्हा त्यांना कुजलेल्या अवस्थेतला मृतदेहही सापडला. भोस्ते घाट हा खेड रेल्वे स्टेशनच्या नजीकचाच उंच डोंगराळ भाग आहे. हा भाग योगेश आर्या राहतो त्या सिंधुदुर्गातल्या आजगावपासून शेकडो किमी लांब आहे. योगेशला जे स्वप्नात दिसलं तशीच हुबेहुब घटना कशी घडली आहे, त्यामुळे नागरिकांसोबतच पोलीसही अचंबित झाले आहेत. हा मृतदेह नेमका कुणाचा आहे आणि हा घातपात आहे का आणखी काही? याचा तपास पोलीस करत आहेत.