बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वाढली जिवितहानीची शक्यता.
संगमेश्वर:- आरवली-माखजन- करजुवे या मुख्य रस्त्यावर एप्रिल ते मे महिन्यात अर्धवट काम करून ठेवले गेले आहे. या अशा अर्धवट कामामुळे पावसाळ्यामध्ये सरंद या गावात बाईक स्वाराचे, रिक्षावाल्याचे अपघात झाले आहेत. तरी बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
पावसाळा संपून दोन महिने झाले आहेत. वेळीच आरवली-माखजन-करजुवे या मुख्य रस्त्याची दुरूस्ती न केल्यास आता थंडीच्या दिवसात पहाटे व रात्री धुक्यामुळे या रस्त्यावर आणखी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. रस्ता अर्धवट केल्याने एक बाजु चांगली तर दुसरी बाजु खोलगट अशी अवस्था झाली आहे. जो-तो वाहन चालक चांगल्या रस्त्याने वाहन घेवून जाण्याचाच प्रयत्न करतो आणि एकमेकाना साईड देताना एक ते दोन फुट खाली कोसळतो आहे. असे अपघात गेले ६ महिन्यांत बरेच झाले आहेत.
रात्रीच्या वेळी अशा अपघातात वाढ होऊन जिवितहानी होण्याची शक्यता आहे. म्हणून बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दुरूस्ती करावी अशी येथील रस्त्यालगत राहणार्या रहिवाशांची मागणी आहे.
”आरवली-माखजन- करजुवे मुख्य रस्त्याला कोणी वालीच नाही कारण लोकप्रतिनिधी फक्त मतांसाठी वाडी वस्त्यावरील रस्त्यांना प्राधान्य देतात आणि मुख्य रस्त्याकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष ना सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास जर कोणतीही जिवितहानी झाल्यास याला लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग जबाबदार राहील ”
– बाबु मोरे,शिवसेना नेते, सामाजिक कार्यकर्ते.