डॉक्टर ठरले देवदूत.
रत्नागिरी:- रत्नागिरी (Ratnagiri Maharashtra) जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात अनेक अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करून अनेकांना आजवर जीवदान मिळाले आहे. रुग्णांसाठी हे हॉस्पिटल मोठ्या आरोग्य सुविधांच्या मदतीसाठी मदतीचे केंद्र बनले आहे. एका नऊ वर्षीय मुलाच्या मेंदूवर अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवण्यात मोठे यश वालावलकर रुग्णालयातील डॉक्टरांना आले आहे.
५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी फोर व्हिलर गाडी समोरून येऊन धडकल्याने अपघातात जखमी झालेल्या चार मुलांना वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चिपळूण तालुक्यात कोकरे गावात हा मोठा अपघात झाला होता. गाडीची ठोकर लागल्याने गंभीर जखमी झालेल्या या मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तातडीने वालावलकर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. यातील तिघांवरती उपचार करून ते बरे झाले. यातील नऊ वर्षाच्या मुलाची प्रकृती चिंताजनक होती. चारचाकीने धडक दिल्यामुळे डोक्याला गंभीर इजा झाली होती.
त्यामुळे आकडी येऊन तोंडातून फेस येत होता. त्याला बेशुद्ध अवस्थेतच रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. डॉक्टरांनी परिस्थितीचा गांभीर्य ओळखून त्याला तातडीने आयसीयूमध्ये दाखल केलं. नंतर तातडीने सिटीस्कॅन करण्यात आला. रिपोर्टमध्ये मुलाच्या कवटीला गंभीर दुखापत झाल्याने कवटीचे हाड मेंदूमध्ये घुसल्याचे आढळून आले. त्यामुळे ही अवघड शस्त्रक्रिया तातडीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही अवघड शस्त्रक्रिया वालावलकर रुग्णालयांचे न्यूरो सर्जन डॉ. मुदूल भटजीवाले यांनी व त्यांच्या टीमने यशस्वी करून या मुलाला जीवदान दिले आहे. डेरवण रुग्णालयातील देवदूत ठरलेले डॉक्टर व त्यांच्या टीममुळे एका नववर्षीय चिमुकल्याचे प्राण वाचले आहेत.