स्थानिक नागरिक व कोकणातील भंडारी समाजामध्ये समाधानाचे वातावरण.
गुहागर:- स्वराज्याचे पाहिले आरमार प्रमुख दर्यासारंग मायनाक भंडारी यांचे नाव गुहागरच्या आयटीआयला देण्याचा कार्यक्रम अंजनवेल, गुहागर येथे ग्रामपंचायत सरपंच सौ वनकर यांच्या हस्ते संपन्न झाला. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कौशल्य रोजगार उद्योजकता विभाग खात्याकडून महाराष्ट्रातील सर्व आयटीआयना महापुरुषांची नावे देण्याचा ठराव संमत करण्यात आला. शासन निर्णय क्र आयटीआय -२०२४ /प्र क्र १२४ / व्यशि -३ दि ८ ऑक्टोबर २०२४ नुसार गुहागर आयटीआयला मायनाक भंडारी यांचे नाव देण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला.
अपराजित योद्धा दर्यासारंग मायनाक भंडारी यांचे नाव संस्थेला दिल्याबद्दल संस्थेचे प्राचार्य श्री प्रीतम शेट्ये यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आणी संस्थेच्या नावाला साजेसे कार्य संस्थेचे सर्व कर्मचारी अधिकारी आणि विद्यार्थी करतील अशी ग्वाही दिली. प्राध्यापक चंद्रशेखर शेंडे यांनी दरवर्षी संस्थेमध्ये मायनाक यांच्या शौर्याचा दिवस म्हणुन १८ सप्टेंबरला आरमार विजय दिन साजरा केला जाईल असे सांगितले यावेळी मायनाक कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुहागर भंडारी समाजाचे युवा नेते साहील आरेकर, अतूल साखळकर, श्री भाटकर, भंडारी समाज रत्नागिरी अध्यक्ष श्री राजीव कीर, प्रा. प्रदीप साळवी, राजेंद्र मानकर, संजयशेठ शिवलकर मायनाक, अशोक मायनाक, अमृता मायनाक, किशोर मायनाक, सुहास मायनाक, प्रशांत मायनाक, आदी उपस्थित होते.