संगमेश्वरकरांच्या मागणीला कोकण रेल्वेने दाखवली केराची टोपली?

0
49

प्रचंड जनअंदोलन उभे करण्याची तालुकावासीयांची तयारी.

संगमेश्वर:- संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात नऊ गाड्यांना थांब्याची मागणी करणारे पत्र निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर या फेसबुक गृपद्वारे देण्यात आले होते. त्यानंतर आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने मागणी करणारा गृप व कोंकण रेल्वेचे CMD यांची एक सयुंक्त बैठक पार पडली. या बैठकीत ९ ऐवजी ३ गाड्यांच्या थांब्याविषयी रेल्वे बोर्डाकडुन मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे स्वत: CMD श्री संतोष कुमार झा यांनी दिले होते. मात्र तीन महिने उलटुन गेले तरीही याबद्दल कोणताही निर्णय न झाल्याने तालुकावासियांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

याबद्दल कोकण रेल्वेकडून कोणताही पत्रव्यवहार करुन या प्रस्तावाचे काय झाले हे सांगण्याचे साधे सौजन्यही कोकण रेल्वे प्रशासनाने दाखवले नाही. यामुळे संगमेश्वर तालुकावासिय कमालीचे संतप्त झाले आहेत. संगमेश्वर रेल्वे स्थानकातून दरवर्षी अपेक्षित उत्पन्न मिळत असले तरीही या रेल्वे स्थानकाकडे कोकण रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. कोणतीही मागणी संघर्ष केल्याशिवाय पुर्ण होत नाही. त्यामुळे आत्तापर्यंतच्या इतिहासात कधीही झाले नाही असे आंदोलन उभे करुन कोकण रेल्वे प्रशासनाला झोपेतून जागे करण्याची गरज असल्याचे मत जनतेतून व्यक्त होत आहे.

नवीन तीन गाड्यांच्या थांब्यांचा सकारात्मक प्रस्ताव केंद्रीय रेल्वे बोर्डाला कोकण रेल्वेने पाठवून सर्व बाबी अनुकूल असताना माशी कुठे शिंकली? हे कळायला मार्ग नाही. आमच्या मागणीबद्दल कोण वेळकाढुपणा काढत आहे? याचा शोध आता संगमेश्वरकरांना घ्यावाच लागेल. येणा-या विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम होण्याची शक्यता असून रेल रोको सारखे एखादे मोठे आंदोलन करण्याची जनतेतून मागणीला जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here