रत्नागिरी:- बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अमानवी अत्याचाराविरोधात रत्नागिरीमध्ये विश्व हिंदू परिषदेच्यावतीने दहा डिसेंबर 2024 रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे. जिल्हाभरात विविध ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने होणाऱ्या या आंदोलनात शिवसेना सहभागी होणार असल्याची माहिती शिवसेना नेते उदय सामंत यांनी दिली आहे.
बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. याचा निषेध विश्व हिंदू परिषद धरणे आंदोलन व मौन पाळून करणार आहे. या आंदोलनात हजारो नागरिक सहभागी होतील असे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे. यासोबत आता या आंदोलनात शिवसेना सहभागी होत असल्याने मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते देखील या आंदोलनात सहभागी होतील असे सांगण्यात येत आहे.
रत्नागिरी येथे आमदार उदय सामंत, राजापूर येथे आमदार किरण सामंत, गुहागर येथे राजेश बेंडल, चिपळूण येथे सदानंद चव्हाण तर खेडमध्ये योगेश कदम देखील विश्व हिंदू परिषदेच्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक घेऊन सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.